दिवस २१ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
अध्याय ३ : विभूतीपाद
सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयौ चित्तस्य समाधिपरिणामः ॥ ३.११॥
ततः पुनः शान्तोदितौ तुल्यप्रत्ययौ चित्तस्यैकाग्रतापरिणामः ॥ ३.१२॥
एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्थापरिणामा व्याख्याताः ॥ ३.१३॥
शान्तोदिताव्यपदेश्यधर्मानुपाती धर्मी ॥ ३.१४॥
क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः ॥ ३.१५॥
अध्याय ३ : विभूतीपाद : सारांश
१) चित्त विषयांकडे धावणे म्हणजे सर्वार्थता व ते एकाच ध्येयावर स्थिर राहणे म्हणजे एकाग्रता होय ! सर्वार्थतेचा क्षय होणे आणि एकाग्रतेचा उदय होणे ही अवस्था म्हणजे चित्ताचा समाधीपरिणाम होय !
२) चंचलपणा हा रजोगुणाचा धर्म आहे ! रजोगुणाचा चंचलपणा कमी करण्यासाठी त्यास एक ध्येय देवून तेथे स्थिर करणे म्हणजेच ध्यान होय !
३) ध्यानाच्या दिर्घ अभ्यासाने चित्त एकाग्रता साधू लागते !
४) विविध सिद्धी ह्या आत्मसाक्ष्त्काराच्या मार्गातील अडथळे आहेत ! ह्या कारणाने श्लोक क्रमांक १५ ते ४२ यांचे सारांश लेखन मला आवश्यक वाटले नाही !
५) चित्त हे नेहमी कोणत्यातरी वृत्तीत परिणाम पावत असते ! इंद्रियद्वारा ज्या विषयाशी त्याचा संपर्क मूढ - क्षिप्त - विक्षिप्त ह्या ३ अवस्थात घडतो त्याप्रकारे तो आकार घेत असतो !
६) ध्यानाच्या सुरवातीच्या अभ्यास काळात ध्येय विषयाच्या ऐवजी दुसराच विषय येतो व हे अपेक्षित आहे !
७) परंतु जसजसा अभ्यास वाढत जाईल तसतसा हा प्रकार कमी होत जातो !
८) ह्या सृष्टीतील समस्त स्थूल व सूक्ष्म पदार्थ हि सर्व मूलतः सत्व - रज - तम ह्या ३ गुणांपासून निर्माण झाली आहेत ! सतत परिणाम पावणे हा गुणांचा स्वभाव असतो !
९) चित्तातील जी वासना आपल्याला प्रतिकूल वाटेल तो क्षीण होईल व जी वासना अनुकूल असेल ती स्ठीरभावास प्राप्त होईल असा पौरुष प्रयत्न करीत गेल्याने योग्य काळात प्रतिकूल वासनेचा संपूर्ण क्षय होईल अनुकूल वासनेचा उदय होईल !
१०) सर्वसाधारण जीवांना अज्ञानकाळात देह म्हणजेच मी अशी दृढ भावना असते ! जेव्हा जीवाला अनेक प्रकारच्या सुख:दुखाचा भोग घडल्यानंतर त्याच्या ठिकाणी एक प्रकारचा निर्वेद म्हणजेच उबग उत्पन्न होतो व तो आत्मिक सुखाच्या शोधात उपासनेच्या मार्गाकडे वळतो !
११) विदेह नावाची एक धारणा देखील एक उपासनाच आहे ! ज्यात व्यष्टी म्हणजेच वैयक्तिक अहंकार नाकारून समष्टीरूप म्हणजेच विराट स्वरूपातील परमात्मा मीच आहे अशी धारणा केली जाते !
१२) विदेह धारणेत साधकाचे मन साक्षीभावावर आरूढ झालेले असते ! विदेह भावना दृढ झाली कि महाविदेह धारणा उदित होयला लागते !
१३) सर्व स्थूल पदार्थ हे पृथ्वी - जल - अग्नी - वायू - आकाश ह्या पंच महाभूतापासून निर्माण झाले आहेत ! त्यास आपण आपल्या पंच ज्ञानेद्रीयानी अनुभवतो !
१४) ह्या स्थूल पदार्थांवर संयम करणे म्हणजे त्यांच्यावर दृष्टी न ठेवता त्यांच्या गुणांवर दृष्टी ठेवायची ! आकाशातून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जल पासून पृथ्वी हा पंच महाभूतांचा क्रम आहे ! आकाशाचा गुण शब्द , वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप, जल म्हणजेच रस, पृथ्वी म्हणजेच गंध असे पंच भूतांचे पंच विशेष गुण आहेत !
१५) वायू हा आकाशापासून उत्पन्न झाला असल्याने वायूच्या ठिकाणी आकाशाचा शब्द हा गुण व स्वतःचा स्पर्श असे दोन गुण आहेत ! अग्नी वायूपासून झाला असल्याने त्यात शब्द - स्पर्श - रूप असे तीन गुण आहेत !
जल अग्नीपासून झाला असल्याने त्यात शब्द - स्पर्श - रूप - रस असे चार गुण आहेत ! पृथ्वी ही जलापासून झाली असल्याने त्यात शब्द - स्पर्श - रूप - रस - गंध हे पाचही गुण आहेत !
0 Comments