दिवस १९ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
अध्याय २ : साधनपाद
स्वविषयासंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः ॥२.५४॥
ततः परमा वश्यतेन्द्रियाणाम् ॥ २.५५॥
अध्याय २ : साधनपाद : सारांश
१) कान - नाक - डोळे - त्वचा - जिव्हा ह्या ५ इंद्रियांचे ५ विषय म्हणजेच शब्द - स्पर्श - रूप - रस - गंध होय !
२) आपले चित्त ५ विषयांचे ग्रहण सदा ५ इंद्रीयांकडून करत असते !
३) चित्ताने इंद्रियद्वारे विषय ग्रहण करणे हा त्याचा विषयांशी होणारा संप्रयोग होय !
४) योगाभ्यासी साधक जेव्हा चित्ताचा निरोध करतो तेव्हा इंद्रियांचा विषयांशी संयोग घडूनही चित्त तेथे नसल्याने त्याकडून विषयग्रहण होत नाही ! ह्या अवस्थेस सूत्रांत विषयांचा असंप्रयोग असे म्हटले आहे !
५) इंद्रियांचा स्विविषयांशी स्पर्श होवूनही ती चित्ताच्या स्वरुपाचेच अनुकरण करत असतात, ते चित्ताशी तद्रूप झाल्यासारखे असतात ! ह्या अवस्थेला प्रत्याहार असे म्हणतात !
६) योग अंगातील पहिली पांच म्हणजे यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार ही बहिरंग साधन होय ! पुढील ३ म्हणजे धारणा - ध्यान - समाधी ह्या अंतरंग साधनसाठी प्रत्याहार ह्या अवस्थेचे विशेष महत्व आहे !
७) प्रत्याहाराचा अभ्यास निट साधलेला असेल तरच पुढील ३ म्हणजे धारणा - ध्यान - समाधी ह्याचे अनुष्ठान चांगल्या रीतीने घडते !
८) चित्ताचा आणि इंद्रियांचा परस्परांशी मधाच्या पोळ्यातील राणीमाशी आणि इतर माशा ह्यांच्या सबंधासारखा सबंध असतो ! मधमाशा ह्या राणी माशी जिथे असेल तिथेच आपली वसाहत वसवत असतात ! राणी माशी उठून गेली बाकी माशाही आपली वसाहत सोडून तिच्यामागे जातात !
९) इंद्रियांचे देखील असेच असते, चित्त जिकडे जाईल तिकडे इंद्रिये वळतात ! चित्त बहिर्मुख झाले की इंद्रिये बहिर्मुख होतात !
१०) कोणतेही बाह्य निमित्त उत्पन्न झाले तरी चित्ताला तिकडे न जावू देण्याचा स्वतंत्र अभ्यास करून इंद्रिय स्वाधीन राखणे हा प्रत्याहार आहे !
११) प्रत्याहार हा एकदा चांगला साधला की इंद्रिये विना प्रयत्न अथवा अत्यल्प प्रय्तानांनी ती स्वाधीन राहू लागतात !
१२) कठोउपनिषदामध्ये इंद्रियांना खट्याळ घोड्याची उपमा दिली गेली आहे ! घोडा स्वाधीन ठेवायला सारथ्याला श्रम पडतात पण घोडा उत्तम गुणी असेल तर तो सारथ्याच्या सहज स्वाधीन असतो ! सारथ्याने नुसता चल म्हटल तरी तो चालू लागतो ! थांबण्याच्या इशाऱ्यावर तो थांबतो ! स्वता:ची ओढ न ठेवता सारथी जेथे नेईल तेथे तो गुमान चालतो ! तात्पर्य हे कि घोडा स्वतःची कोणतीही इच्छा न ठेवता सर्वस्वी सारथ्याच्या इच्छेनुसार वागत असतो ! यास घोड्याची परमांवश्यता असे म्हणतात !
१३) प्रत्याहाराच्या अभ्यासाने इंद्रियांची अशी परमांवश्यता साधकास प्राप्त होत असते ! साधकाची इच्छा असेल तेव्हाच ती विषयाभुमिक होतात आणि त्याच्या मनात येईल तेव्हा ती विषयापासून निवृत्त होतात ! ज्यामुळे साधक धारणा - ध्यान - समाधी यांच्या अभ्यासाला पात्र होतो !
१४) याप्रमाणे योगदर्शनाचा साधनपाद हा दुसरा अध्याय इथे पूर्ण झाला !
0 Comments