दिवस १२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
साधनपाद:
ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः॥२.१०॥
ध्यानहेयास्तद्वृत्तयः॥२.११॥
क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्टजन्मवेदनीयः॥२.१२॥
सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः॥२.१३॥
ते ह्लादपरितापफलाः पुण्यापुण्यहेतुत्वात्॥२.१४॥
परिणामतापसंस्कारदुःखैर्गुणवृत्तिविरोधाच्च दुःखमेव सर्वं विवेकिनः॥२.१५॥
१) क्लेशांचा नाश २ साधनांनी करता येतो. प्रतिप्रसव व ध्यान ! अविद्या व अस्मिता हे क्लेश नेहमी सूक्ष्म रुपात असतात व हेच वृत्तीरुपाने राग - द्वेष - अभिनिवेश ह्या क्लेशामध्ये परिवर्तीत होतात ! प्रतिप्रसव म्हणजे राग - द्वेष - अभिनिवेश ह्या क्लेशांचा अस्मिता व अविद्या मध्ये विलय करणे !
२) जेव्हा क्लेश वृत्तीरुपाने परिणाम पावतात तेव्हा त्यांचा नाश ध्यानाने करावा !
३) कर्माशय : प्राणीमात्रांकडून जी कर्मे घडतात ती सुरवातीला चित्तातील ५ क्लेशांमुळे घडत असतात !
४) ह्या कर्मांचे संस्कार चित्तावर घडत असतात ! ह्या संस्कारालाच कर्माशय म्हणतात ! कार्माशयच जन्माला कारण होत असतो !
५) चित्तावर सात्विक - राजस - तामस ह्यापैकी जे संस्कार दृढ व उत्कट असतील त्या अनुसरून पुढील जन्म प्राप्त होत असतो !
६) जीवाला कोणत्या योनित जन्म मिळेल हे कर्मशयास मूळ असलेल्या क्लेशावर अवलंबून असते !
७) एकच गोष्ट एकाला सुखकारक व दुसऱ्याला दुःखकारक ठरत असते ती प्रत्येकाच्या मनस्थितीवर अवलंबून असते व मनस्थिती हि चित्तावर ! चित्तावर असलेले अनेक जन्माचे संस्कार हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात !
८) चित्तामध्ये जोपर्यंत क्लेश आहेत तोपर्यंत कर्माशय आहे व जोपर्यंत कर्माशय आहे तोपर्यंत जन्म आहे !
९) शुद्ध आचरण हेच सुखी जीवनाचे सूत्र आहे !
१०) ज्याच्या चित्तात विवेक जागृत होतो त्याला त्याच्या शुध्द कर्मामुळे प्राप्त झालेले आल्हाददायक भोग देखील दुःखरूपच आहे अशी प्रतीती येते !
११) परिणाम दुःख : अग्नीमध्ये तूप टाकल्याने जसा अग्नी अधिक उग्र स्वरूप धारण करतो त्याप्रमाणे विषयभोगाने इंद्रिय तृप्त न होता अधिक राग - द्वेष क्लेश निर्माण करून दुःखास कारण होतात यास परिणाम दुःख म्हणतात !
१२) तापदुःख : अनुकूल भोगसाधन प्राप्त करून घेण्यासाठी लागणारे कष्ट, त्यासाठी करावा लागणारा निग्रह, प्राप्त करण्याच्या प्रयत्नात होणारे विवध कर्म, त्या भोगांचे रक्षण करण्यासाठी पडणारे कष्ट, त्यांचा नाश तर होणार नाही याचे सतत भय, नाश झाल्यास होणारे मानसिक दुःख हे विवेकी पुरुषाला तापदुःख ठरत असतात !
१३) संस्कारदुःख : सुखे प्राप्त व्हावी व दुःख टाळावीत म्हणून मनुष्याकडून जे इष्ट - अनिष्ट कर्म घडत राहते त्याचा चित्तावर शुद्ध - अशुद्ध संस्कार घडतो व ज्याला कर्माशय म्हणतात जे जन्म-मरणरूप चक्राला फिरवीत असते त्यास संस्कारदुःख म्हणतात !
१४) गुणवृत्तीविरोधदुःख : राजस वृत्ती नियमाने सुखकारक भासणारे भोग व त्यातून उतन्न होणारे दुःखदायक फल देते, तामस वृत्ती प्रमाद, मोह व अज्ञान वाढविणारी असल्यामुळे सुखविरोधीच फल देते ! सात्विक वृत्तीच फक्त शाश्वत सुखाकडे नेत असते ! परंतु चित्तात सात्विक वृत्ती टिकविणे बऱ्याच वेळा बाह्य कारणामुळे अवघड होते ! तेव्हा सात्विक - रजस - तमस वृतींचा परस्परांशी होणारा संघर्ष हा गुणवृत्तीविरोधदुःख होय !
१५) अशा ह्या दुःखसमुदायरूपक संसाराचे मूळ हे अविद्या होय आणि आत्मसाक्षात्कार हेच एकमेव त्या अविद्याचा नाश करण्याचा उपाय होय !
0 Comments