ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस १०
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
क्रियान्तरासक्तिमपास्य कीटको
ध्यायन्नलित्वं ह्यलिभावमृच्छति।
तथैव योगी परमात्मतत्त्वं
ध्यात्वा समायाति तदेकनिष्ठया॥
श्लोक ३५९ - विवेकचूडामणी - आदिशंकराचार्य
अर्थ : ज्याप्रमाणे कीटक इतर सर्व क्रिया टाकून देवून भ्रमराचेच ध्यान करीत राहिल्यामुळे स्वतःच भ्रमर होतो, त्याचप्रमाणे योगी एकनिष्ठ राहून परमतत्वाचे ध्यान करीत असता स्वतः परमात्माच बनतो !
साधनपाद:
तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः॥२.१॥
समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च॥२.२॥
अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः॥२.३॥
अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्॥२.४॥
अध्याय २ : साधनपाद : सारांश
१) चित्तशुद्धी व्हावी एवढ्या एकाच हेतूने शरीर - वाणी - मन यांच्यावर ठेवलेले नियंत्रण हे तप होय !
२) मंत्रांचा जप, शास्त्राचा अभ्यास हा स्वाध्याय होय !
३) आपली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून करणे म्हणजे ईश्वरप्रणिधान होय !
४) तप - स्वाध्याय - ईश्वरप्रणिधान ह्यांचे सदा सर्वदा आचरण म्हणजेच क्रियायोग होय !
५) तप जर सत्कार - मान - पूजा ह्या हेतूने केले असेल तर ते राजस तप होय !
६) तप जर दुसऱ्यांच्या द्वेषाने केले असल्यास ते तामसिक तप होय !
७) कोणत्याही व्यावहारिक फळाची अपेक्षा न ठेवता केलेले तप हे सात्विक तप होय !
८) सात्विक तप कायिक - वाचिक - मानसिक अशा ३ प्रकारचे असते !
९) सर्व जीवमात्रांशी सहृदयपणे वागून शरीर जीभ यावर नियंत्रण हे कायिक तप होय !
१०) इतरांना दुःख होईल असे न बोलणे, मौन राखणे, सत्य-प्रिय-हितकर बोलणे, अप्रिय बोलणे अपरिहार्य असेल तेव्हा सुहृदयभावाने - सौम्य शब्दात बोलणे, ईश्वर नामजप करणे म्हजेच आपल्या वाणीची प्रवृत्ती स्व-पर हितार्थ ठेवणे हे वाचिक तप होय !
११) मन शांत - प्रसन्न ठेवणे, सर्वांशी सौम्यपणे वर्तन ठेवणे, सर्व प्रकारची कर्म करत असताना चित्तशुद्ध हे स्मरण ठेवणे, कोणाचेही अनिष्ट न चिंतणे, सर्वांचे कल्याण चिंतणे, ई . मानसिक तप होय !
१२) मंत्रजप - बुद्धीची कुशाग्रता - सूक्ष्मता आणून तिला आत्मदर्शनाची योग्यता उत्पन्न करण्यास सहायभूत ठरणाऱ्या शास्त्रांचे - ग्रंथाचे वाचन - अध्ययन हा स्वाध्याय होय !
१३) आपल्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांना ईश्वरअर्पण करून करत राहणे यास ईश्वरप्रणिधान म्हणतात !
१४) समाधीभावना व चित्त बहिर्मुख होत असल्या कारणाने उत्पन्न होणाऱ्या क्लेशाना शिथिल करत राहणे यामध्ये वरील क्रियायोग करणे आवश्यक आहे !
१५) क्रियायोगाने अहंता - ममता - भाव - राग - द्वेष असे ५ क्लेश शिथिल होण्यास मदत होते !
१६) अविद्या - अस्मिता - राग - द्वेष - अभिनिवेश हे ५ क्लेश ( दुःख ) होय
१७ ) अविद्या हि अस्मिता - राग - द्वेष - अभिनिवेश ह्या ४ क्लेशांची प्रसवभूमी होय म्हणजे कारण होय !
१८) क्लेश ४ अवस्थेत भ्रमण करतात ! प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार !
१९) अनेक जन्म्मांच्या संस्कारांनी तयार झालेल्या परंतु चित्तातील सुप्त वासना म्हणजे प्रसुप्त वासना होय !
२०) एखादी वासनापूर्ती केवळ प्रतीकुलतेमुळे उपशांत झाली असता ती स्मृतीत राहते तीच तनु वासना होय !
२१) वासनेची जागृती झाली, पूर्ततेची ईच्छा झाली, क्रिया करण्याची प्रेरणा झाली तरीदेखील एखाद्या दुसऱ्या कारणाने ह्या सगळ्यांचे पर्यवान कृतीत झाले नाही हि विच्छिन वासना होय !
२२) वासनापूर्ती झाली असता त्यास जबाबदार वासना ह्या उदार वासना होय !
२३) जीवांच्या अंतकरणात विच्छिन्न व उदार वासनांचा सदैव झगडा सुरु असतो !
२४) इंद्रियांची विषयाकडे ओढ हीच वासनांच्या पुर्ततेला कारणीभूत असते !
२५) जिवाकडून कोणत्याही प्रकारचे कर्म होण्यास कारणीभूत ४ मुल्ये म्हणजे कारण असतात ! शारीरिक - मानसिक - बौद्धिक - अध्यात्मिक !
२६) मानसिक मनोविकार हे राग - द्वेष - काम - क्रोध - लोभ - दंभ - दर्प - असूया - मत्सर इत्यादि राजस गुणांना कारण आहेत !
२७) मानसिक मुल्यांमध्ये विकार आणि भावनांना स्थान असते तर बौद्धिक मूल्यात विचारांना स्थान असते ! बौद्धिक मुल्यामुळे मनुष्यप्राणी आपल्या मनोविकारांवर प्रभुत्व मिळवू शकला असून तो रानटी मनोवृत्तीतून काही अंशता बाहेर पडला आहे !
२८) बौद्धिक मुल्यांच पर्यावसन अध्यात्मिक मूल्यात न झाल्यामुळे इंद्रियसुख अति प्रमाणामध्ये मिळूनदेखील चित्तशांती काही केल्या मिळत नाही !
२९) बौद्धिक मूल्यांच्या बळावर विषयभोग उपभोगुन त्यांना अधिक भोगायची वृत्ती चित्तात प्रबळ होत असते !
0 Comments