थकून आलेल्या बापाच्या पाठीवर हट्टाने बसून कधी घोडा घोडा तर कधी साखरेच पोत खेळत, थकत, बापाच्याच कुशीत विसावत रम्य ते बालपण सरून गेल ! बापाची हरवलेली ती कुस पुन्हा गवसलीच नाही !
मिसरूड फुटत गेल,लहानपणी लेकराच्या हट्टापायी घोडा बनलेला बाप जसा सूर्यासारखा दाहक वाटायला लागला तस बापाच्या कुशीत शिरायचंच राहून गेल !
तरुणपण आल, बापाच्या स्वप्नांचं ओझ पेलवेनास झाल, बापाच्या स्वप्नांशी माझ्या स्वप्नांनी फारकत घेतली, जस बाहेरच जग आपल आणि बाप परका वाटायला लागला तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेल !
बाहेरील झगमगणाऱ्या जगाने डोळे दिपायला लागले, मित्रांच्या मिठीत सुख दिसायला लागल ! मर मर कष्ट करून रक्ताचं पाणी करणाऱ्या बापाच्या सुरकुत्या कधी वाढत गेल्या कळलच नाही तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेल !
दिवस सरत गेले, बाप थकत गेला, झगमग दुनियेच्या दुकानदारीने डोळ्यासमोर अंधार उभा केला, बाप-लेकाच्या स्वप्नांनी घेतलेल्या फारकतीचा अंत जवळ आला, वाटल आता बापाच्या कुशीत शिरून ढाय मोकलून रडावं, बापाने पाहिलेल्या स्वप्नांना साकार करून जग पालथ घालाव !
परंतु नियती सोप्या शिक्षा कधी देत नाही, शिक्षांच्या बदल्यात लाच ती काही घेत नाही !
नियतीने बापाचा मृतदेह समोर टाकला, पहाडासारखा भक्कम बाप क्षणात माती झाला, माती झालेल्या बापाला पाहून रागाने ब्रह्मांडाच्या बापाकडे पाठ फिरवली, जन्मदात्या बापासोबत केलेली चूक पुन्हा मी गिरवली ! परंतु ह्या वेळेस चूक लगेच उमगली व उशीर होयच्या आत ब्रह्मांडाच्या बापाच्या पायाशी लोळण घेतली ! ब्रह्मांडाचा बापच जन्मदात्या बापाच्या रुपात असतो जस मला कळाल तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेल !
बापाची
सूर्यासारखी दाहकता जीवन सृजनासाठी आवश्यकच असते ही अक्कल बाप झाल्याशिवाय काही
येत नसते, आणि उशिरा आलेली अक्कल बापाची कूस काही देत नसते ! बापाची कूस काही देत
नसते !
0 Comments