बाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा !
सर्वात प्रथम १३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांना शत शत नमन !
आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी “राष्ट्रप्रेम” ह्या अत्यंत पवित्र भावनेतूनकित्येकानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे ! त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे.
असाच एक उपेक्षित राहिलेला १३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा ! ज्याने अवघ्या १३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली !
१९२५ साली ओरिसातील निलकंठपूर जिल्ह्यातील ढेंकानाल गावात बाजी राउतचा जन्म झाला. बाजी लहान असतांनाच त्याचे वडील हरिप्रसाद राउत यांचे निधन झाले, त्या पश्चात बाजीच्या आईने अत्यंत हलाखीमध्ये बाजीचे संगोपण केले. आईला मदत म्हणून बाजी लहान वयातच ब्राह्मणी नदीवर नौका वाहकाच काम करू लागला. लहानपणापासूनच बाजी आपल्या ढेंकानाल संस्थांनच्या राजाचा ( शंकर प्रताप सिंघ देव ) प्रजेवर होत असलेल्या निर्दयी अन्यायाला पाहत आला होता, व ह्या अन्यायाविरुद्ध गावातील “वैष्णव चरण पटनायक” यांनी राजाविरुद्ध बंड उभारले व प्रजामंडल नावाच्या संघटनेची स्थापना केली. आणि लहान बाजी ह्या संघटनेसाठी काम करू लागला !
प्रजामंडल संघटनेच्या सदस्यांनी राजाच्या विरोधात बंड उभारून राजाच्या नाकात दम आणला होता. वैष्णव चरण पटनायक यांच्या शोधात राजाचे सैनिक व ब्रिटीश पोलीस भुवन गावाच्या लोकांवर अनन्वित अत्याचार करत होते, कित्येकाना त्यांनी तुरुंगात डांबल. त्या विरोधात प्रजामंडल संघटनेच्या नेतृत्वात लोकांनी १० ऑक्टोबर १९३८ रोजी आंदोलन केले ज्यावर ब्रिटीश पोलीस व राजाच्या सैनिकांनी गोळीबार केला व त्यात २ गावकरी मृत्युमुखी पडले ! त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि राजचे सैनिक व ब्रिटीश पोलीस आपला जीव वाचवण्यासाठी ढेंकानाल गावाकडे पळाले. त्यांना ढेंकानाल गावात जाण्यासाठी ब्राह्मणी नदीला ओलांडून जाणे गरजेचे होते व ते ११ ऑक्टबर१९३८ रोजी ब्राह्मणी नदीच्या किनारी नीलकंठ घाटावर पोहोचले. तिथे १३ वर्षीय बाजी नदीवर गस्त ठेवायचे काम करत होता. सैनिक व ब्रिटीश पोलिसांनी त्याला आपल्या नौकेतून ढेंकानाल गावात पोहोचवण्याचा आदेश दिला, परंतु १३ वर्षीय धीट बाजीने निर्भीडपणे त्यांना नकार देऊन गावातील लोकांना गोळा करण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. १३ वर्षीय बाजीच्या ह्या विरोधाने चिडलेल्या ब्रिटीश पोलिसांनी बाजीवर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या, ज्यात बाजी सोबत लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांचा मृत्यू झाला ! ह्या लहान बालकांच्या बलिदानाने देशभरात संतापाची लाट उठली व स्वातंत्र्य संग्रामच्या चळवळीने अधिक जोर पकडला.
बाजी सारख्या अनेक शहीदांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा आज स्वैराचार म्हणून होत असलेला वापर पाहून ह्या महान शहिदांचे बलिदान व्यर्थ तर जात नाहीये ना हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही ! राष्ट्रगीत व राष्ट्रगान म्हणण्यावरून ह्या देशात विरोध व चर्चा घडवाव्या लागतात हे ह्या शहिदांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल.
१३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांना शत शत नमन !
0 Comments