फिटे अंधाराचे जाळे !

फिटे अंधाराचे जाळे !






ह्या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहिल्यावर ह्या ओळी नाही आठवल्या तरच नवल ! कारण काय आहे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागचे ? अहो स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षा नंतर ह्यांना वीज बघायला मिळतेय ! हे काही फोटो आहेत कारगिल मधील व काही उत्तर प्रदेशच्या हरदोई तहसीलच्या ठाकुरी खेड्यातील. शहरी भागात २ तास लोड शेडींग झाल्यानंतरचा आपला त्रागा आठवा ! ह्या लोकांनी तर यांची पूर्ण १ पिढीच विजेविना घालवलीये ! विजेची जी परिस्थिती तीच दोन वेळच्या अन्नाची, रस्त्यांची, पाण्याची, शिक्षणाची व डोक्यावरील छपराची

शाळेत शिकवल्या जाणाऱ्या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता कुठवर झाली याची चिकित्सा आपल्या मागच्या पिढ्यांनी जर केली असती तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी राहिली असती ! जी चुकी मागच्या पिढ्यांनी केली ती आजची पिढी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया ! मागच्या पिढ्यांना दोष देणे कदाचित बहुतेक जणांना पचनी पडणार नाही, पण देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवता हा दोष मागच्या पिढ्यांच्या माथ्यावरच टाकावा लागेल. आंधळ्या विश्वासाने कोणत्याही स्वार्थाशिवाय एका पक्षाच्या ( घराण्याच्या ) हातात देशाची सत्ता सोपवताना त्यांनी आपल्या भविष्याचा विचार नाही केला हि त्यांची चूकच आहे ! 

आजची पिढी ही चूक करणार नाही अशी खात्री ठेवण्याचे भरपूर कारण देता येतील ! आज कुठेही जरा माशी शिंकली की ती ब्रेकिंग न्यूज झाल्याशिवाय राहत नाही ! आता त्यातही सरकार दरबारी आपली बुद्धी दावणीला टांगलेली बरीच मंडळी असतातच, परंतु आज माहितीची उपलब्धता फक्त ह्याच लोकांवर अवलंबून नाही ! मागच्या पिढ्यांना ह्या लोकांशिवाय दुसरे काहीही खात्रीशीर माध्यम नव्हते ! निवडणुकिच्या आधी एका झोपडीत जमिनीवर बसून जेवण केल्याचा किंवा एखाद्या गरीबाच्या नागड्या-शेम्डया मुलाला कडेवर घेऊन फोटो काढून वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकवला की ५० % जनतेचे मत खिशात ! आज अशा खेळांनी मत अगदीच भेटणार नाही अस नाहीये परंतु याची टक्केवारी फार फार तर १० % कारण हेच खेळ आजच्या काळात देखील खेळण्याचे प्रयत्न झालेच आहे परंतु त्यांचे मतामध्ये फार काही रुपांतर झालेले नाही हे येणाऱ्या निकालानंतर स्पष्टच होत गेलय ! आजच्या देशाच्या प्रगतीमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक सरकारचा नक्कीच वाटा आहे यात कुणीही बुद्धिवाद व विवेकवाद जिवंत असलेल्या व्यक्तींना शंका नसेलच, आजच्या अंतराळ संशोधन, उच्चशिक्षण, विज्ञान सारख्या क्षेत्रामधील प्रगतीचा पाया हा आधीच्या प्रत्येक सरकारनेच रचला आहे यातही शंका नाही परंतु ५० % पेक्षाहि कमी घरामधे असलेल्या शौचालयासाठी, कित्येक खेड्या-गावामध्ये विज-रस्ता-पाणी-शिक्षण-रोजगार ह्या मुलभूत गरजा पूर्ण न करण्यासाठी देखील तेच सरकार जबाबदार नाहीत काय हा प्रश्न देखील बुद्धिवाद व विवेकवाद जिवंत असलेल्या व्यक्तीं विचारल्याशिवाय राहणार नाहीच ! ढोंगी पुरोगामीत्व, सरकार दरबारी गहाण पत्रकारिता, विशिष्ट व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून त्यांना देवतुल्यत्व बहाल करणारी व त्यांच्या देशहितासाठी बाधक ठरलेल्या निर्णयांची पद्धतशीरपणे गुंडाळणी करणारी नेहृरुवियनअभ्यासक जमात,देशहिताच्या निर्णयामध्ये अडथळा आणणारे व समाजसेवकाच्या बुरख्याखाली लपलेले समाजसेवक यांच्या आधारे सत्तास्थापनेचे दिवस यापुढचे नक्कीच राहणार नाहीत हे नक्की !
सोशल मिडियाने तर काही देशांमध्ये क्रांतीदेखील घडवून आणल्या आहेत, सत्तास्थाने डळमळीत केलेली आहेत, तेव्हा आजच्या सरकारला बाप दाखव नाही तर श्राद्ध घालह्या म्हणीला कायम डोक्यात ठेवून जनतेच्या हितांची पूर्तता करावीच लागेल. माहितीचा प्रचंड असा खजिना आज सहजपणे उपलब्ध होऊ शकतो ह्याची देखील आजच्या सरकारला जाणीव ठेवण अनिवार्य आहे ! 

आता जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेदेखील असतातच ! सोशल मिडियाचा दुरुउपयोग जातीय-धार्मिक-प्रांतीय-भाषिक तेढ वाढविण्यासाठी, तेव्हढाच जोरदारपणे केला जातोय हे वास्तव नाकारता येणार नाही, परंतु जर प्रत्येकाने देशहित सर्वोच्च ह्याला प्राथमिकता देवून प्रत्येक गोष्टीची अभ्यासपूर्ण शहानिशा केली तर सामाजकंटकांचे हेतू नक्कीच धुळीस मिळतील ! आजच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला तर मजबूत विरोधकांची भूमिका ही कोणत्याही पक्षाच्या व संघटनेच्या खुंटीला न बांधलेल्या सुज्ञ जनतेलाच पार पाडावी लागणार आहे हे लक्षात घ्यावे लागेल ! कारण मागच्या पिढ्यांनी केलेली चूक व त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेतच

व्यक्तिकेंद्रित व घराणेशाही केंद्रित सत्तास्थाने हे देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचा अडसर आहे हेदेखील समजून घ्यावे लागेल ! मग ती व्यक्ती सद्य पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी असो अथवा कॉंग्रेसचे होणारे नवीन अध्यक्ष श्री. राहुल गांधी असो ! भारताच्या सर्व नागरिकांसाठी मुलभूत सुविधांची पूर्तता येणाऱ्या काळात होईल अथवा ना होईल हे आपल्या जागुरुकतेवर अवलंबून राहणार आहे ! आतापुरते ह्या हसऱ्या चेहऱ्यांच्या आनंदा मध्ये सहभागी होऊया !

Post a Comment

0 Comments