
श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस ३
१ ) अस्तित्वात असलेल्या सर्वांस ज्याने व्यापले आहेत आणि आपल्या अनुभवास येणाऱ्या दृश्य जगताचे जे अधिष्ठान आहे ते म्हणजे सत. आकार, रंग वेगवेगळे असलेल्या वेगवेगळ्या मातीच्या भांड्याना त्यांच्या उपयोगितेनुसार किंवा त्यातील वस्तू नुसार वेगवेगळी नावे असतात तरीही त्या सर्वांमधील माती एकच असते आणि मातीशिवाय भांड्याचेअस्तित्व नसते. मातीतून ते उत्पन्न होतात माती त्यांचे अस्तित्व असते त्यांचा नाद झाल्यावर त्यांची नामेरूपे मातीशी एकरूप होतात. त्याचप्रमाणे परिवर्तनशील संपूर्ण जगत अपरिवर्तनशील सतस्वरूपाने व्यापलेले आहे.
२ ) इंद्रिय-मन-बुद्धी ही ज्ञानग्रहणाची उपकरणे जड असतात आणि जीवनशक्ती चैतन्याकडून शक्ती मिळाल्यावर त्यांना विषय ज्ञान होऊ शकते.
३ ) प्रत्येकाने पराजयाची प्रवृत्ती सोडून जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीच्या परिस्थितीचा निष्ठापूर्वक धैर्याने सामना केला पाहिजे. अधर्माचा सक्रिय प्रतिकार हा श्रीकृष्णांचा गीतेतील मुख्य संदेश आहे.
४ ) जन्म-अस्तित्व-वृद्धी-विकार-क्षय व नाश अशी सहा प्रकारची परिवर्तने शरीरात होतात ज्यामुळे शरीराला दुःख भोगावे लागते. एका मर्त्य शरीराला भोगावे लागणाऱ्या सर्व दुःखाची कारणे आत्म्यास संभव होत नाही.
५ ) जो पुरुष अविनाशी आत्म्याला जाणतो तू जीवनातील परिस्थितींना तोंड देताना कधीही शोकाकुल होऊन जात नाही.
६ ) मृत्यूचा विचार ज्यांना त्याविषयी काही ज्ञान नाही अशांनाच भयभीत करतो.
७ ) कोणत्याही वस्तूला व्यक्त म्हणतात तेव्हा तिचे ज्ञान आपल्याला एक किंवा त्याहून अधिक इंद्रियांनी होऊ शकते. जे पाचही ज्ञानेन्द्रियांना अगोचर असते त्याला अव्यक्त असे म्हणतात. आंब्याच्या बी मध्ये पूर्ण वाढलेल्या अम्रवृक्षाला मी पाहू किंवा ऐकू शकत नाही किंवा मला त्याचा गंध-स्पर्श-स्वाद जाणवत नाही आणि तरीही मला माहित असते की बी वृक्षाचे कारण आहे. अशावेळी आपण म्हणतो की वृक्ष बी मध्ये अव्यक्त आहे त्याचप्रमाणे जेव्हा सत्य अव्यक्त आहे असे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की ते कोणत्याही इंद्रियाने जाणता येत नाही. आपली ज्ञानेन्द्रिय नित्य तत्त्वास इंद्रिय ग्रहनाचा विषय का बनवू शकत नाही याचे सविस्तर वर्णन उपनिषदांमध्ये केले आहे आत्मा सर्वांचा दृष्ट असल्यामुळे तो दृश्य विषय असू शकत नाही !
८ ) जीवन म्हणजे जन्म मृत्यूची निरंतर श्रृंखला आहे.
९ ) ऐन उन्हाळ्यात भर दुपारी उन्हात उभे राहून सूर्याच्या ताप व तेजाविरुद्ध तक्रार करणे मूर्खपणाचे आहे तसेच जीवन धारण करून त्याच्या स्वभावाविषयी तक्रार करणे ही अक्षम्य मूर्खता आहे.
१ ० ) सर्वसामान्यपणे कार्य व्यक्त रुपात आढळते आणि कारण अव्यक्त असते. कार्याची उत्पत्ती कारणातून होते अर्थात सृष्टीचा अर्थ आहे वस्तूंचे त्यांच्या अव्यक्त अवस्थेतून व्यक्त अवस्थेत येणे. हा क्रम निरंतर नियमपूर्वक चालत आलेला आहे याप्रकारे आजचे जे व्यक्त ते आजच्या आधी अव्यक्त होते वर्तमान काळात ते व्यक्त रूपात उपलब्ध आहे परंतु भविष्यकाळात पुन्हा ते अव्यक्त्यात विलीन होईल याचा अर्थ असा की वर्तमान स्थिती अज्ञानातून आली आणि पुन्हा अज्ञानात लीन होईल.
१ १ ) जो मनुष्य आपल्या आत्मस्वरूपाच्या वैभवा प्रती जागरूक झालेला आहे तो ईश्वरच आहे आणि श्वास्वरूपाच्या वैभववीलालास विस्तृत झालेला ईश्वर मोहित जीव. प्रथम ह्या जीवाला शरीर मन बुद्धीच्या अतीत असलेल्या आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार समजणे हेच कठीण जाते आणि जेव्हा आत्मविकासाच्या साधनेचा अभ्यास करून आपल्या आत्मस्वरूपाला तो जाणतो तेव्हा त्या इंद्रियातील अनंत आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन तो आश्चर्यचकित होतो.
१ २ ) अज्ञानी पुरुष देखील श्रवण मनन निदिध्यासन याद्वारे असामान्य श्रेष्ठ ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतो.
१ ३ ) या जगात प्रत्येक प्राणी पूर्वार्जित वासनानुसार एका विशिष्ट देहात विशिष्ट प्रयोजनार्थ जन्म घेतो हे विशेष प्रयोजन म्हणजे वासनांचा क्षय. ज्या वासनांसहित जीव विशेष शरीर धारण करतो त्यांना स्वधर्म असे म्हणतात.
१ ४ ) जीवनात प्राप्त झालेली ही वासनाक्षयाची संधी गमावली तर विकासाच्या मार्गात बाधा उत्पन्न होते. वासनांचा क्षय जर झाला नाही तर माणसाच्या मनावरील वासनांचा दाब वाढतो कारण पूर्वार्जीत वासनांमध्ये नवनवीन संस्कार एकत्रित होतात.
१ ५ ) आपल्या आत्मस्वरूपाला विसरून मनुष्य ज्या चुका करतो त्यांना पाप असे म्हणतात. विषय उपभोग घेण्यासाठी मन वस्तू जगतामध्ये धडपडत असते तेथे आनंद व सुख मिळेल अशी त्याला आशा असते पण त्यामुळे मनात अधिका अधिक विक्षेप निर्माण होतात अशा प्रकारची मनाने केलेली चूक म्हणजेच पाप होय.
Ganesh K Avasthi
Blog Admin
0 Comments