श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस २
७ )एकदा का आपण परिस्थितीचे चुकीचे मूल्यांकन केले की आपल्या भावना आपल्या आकलन शक्तीला झाकाळून टाकतात.
८ )विवेकशील बुद्धी म्हणजेच आत्मनिष्ठ मन.
९ )मन एखाद्या आवक जावंक कारकूनाप्रमाणे प्रमाणे कार्य करीत असते, ज्ञानेंद्रियांनी आणलेल्या संवेदना ते प्राप्त करते आणि त्यांची यथायोग्य मांडणी करून बुद्धीकडे तिच्या निवाड्यासाठी पाठवून देते, बुद्धी भूतकाळात तशाच प्रकारच्या घडलेल्या घटनांच्या स्मृतींचा संदर्भ घेऊन अंतिम निर्णयापर्यंत येते आणि तो निर्णय कृतीत आणण्यासाठी मनाकडे पोहोचवते ते निर्णय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक त्या आज्ञा मन कर्मेंद्रियांना देते. वस्तू जगताच्या संपर्कात असताना आपल्या जागृत अवस्थेत हेच क्षणोक्षणी घडत असते. जेव्हा ही उपकरणे सुसंघटितपणे सुसंगतेने कार्य करीत नाही तेव्हा व्यक्तीचे व्यक्तिमत्व भंग पावते आणि तो जीवनसंग्रामाला यशस्वीपणे तोंड देण्यास असमर्थ ठरतो जेव्हा त्याची मन-बुद्धी योग्य ज्ञानाने यथास्थित केली जातात तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व पुन्हा संघटित होते आणि तो आपले कार्य कुशलतेने करण्यास समर्थ होतो.
१ ० )कोणत्याही वस्तूचा तो विशिष्ट गुण ज्यामुळे त्याचे अस्तित्व सिद्ध होते तो त्या वस्तूचा धर्म असतो ! आपल्या स्वभावाला सोडून ती वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही आणि तो स्वभाव ज्याच्यामुळे ती वस्तू ती असते तोच तिचा धर्म !
१ १ )हिंदू संस्कृतीमध्ये मानव धर्माचा आग्रह धरला जातो म्हणजेच माणसांनी त्यांच्या खऱ्या स्वरूपा नुसार राहिले पाहिजे ते स्वरूप म्हणजे दिव्य व दैवी स्वरूप . म्हणूनच जीवनातील सर्व प्रयत्न आत्मवैभवात राहण्यासाठी केले पाहिजे. माणसाने जीवनभर दिशाहीन जनावरांप्रमाणे मार्गक्रमण करता कामा नये.
१ २ )शुद्ध आत्म्याच्या अज्ञानामुळे अहंकार उत्पन्न होतो. हे अज्ञान दिव्य स्वरूपावर अच्छादन टाकते व त्याचबरोबर त्याच्या सत्य स्वरूपाबाबत भ्रमंती उत्पन्न करते.
१ ३ )मोहग्रस्त व्यक्तीला आसक्तीचे मूल्य दुःख व शोक यांच्या रूपात चुकवावेच लागते. चुकीच्या तादात्म्यामुळे निर्माण झालेल्या दुःखाचा शेवट करण्याचा उपाय एकच आहे अहंकाराहून श्रेष्ठ असलेल्या आत्मस्वरूपाला जाणणे. माणसातील नित्य चैतन्य स्वरूप आत्मा शरीराशी चुकीचे तादत्म्य प्रस्थापित करून वस्तू व व्यक्तींच्या जगताशी अनेक प्रकारांनी संबंध साधून बंधन अनुभवतो. तेच आत्मतत्त्व मनाशी तादात्म्य करून भावना जगत जणू त्याचेच असल्याप्रमाणे वागतो व अपूर्णत्व अनुभवतो. तेच दिव्य चैतन्य तत्व बुद्धीचे चुकीचे बुद्धीशी चुकीचे तादात्म्य साधून तिच्या विशेष लक्षणांची आशा-कामना-महत्त्वकांक्षा-आदर्श यांच्याशी संयुक्त होतो व दुःखी होतो. अशा प्रकारे इंद्रिय, मन, बुद्धीत प्रतिबिंबित झालेले आत्मतत्त्व म्हणजे अहंकार. तो वस्तू जगात भावना व विचार यांचा शिकार बनतो. जीवनातील मिळवणे व साठवणे याबाबतीत असंख्य दुःख क्षणिक सुख याचा धनी हा जीवच असतो.
१ ४ )आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक स्तरावरून आपण जीवनाचे अवलोकन करतो आणि वस्तूंविषयी आपले स्वतःचे निष्कर्ष काढतो. शरीराच्या स्तरावरून आपली जगाकडे बघण्याची दृष्टी मनाच्या स्तरावर भावनांद्वारे बघण्याची दृष्टी आणि बुद्धीच्या स्तरावरची वैचारिक दृष्टी वेगवेगळी असते.
१ ५ )भौतिक वस्तूंच्या दोष किंवा अपूर्णतांमुळे होणारी दुःखे माझ्या भावनांमध्ये परिवर्तन आल्यामुळे दूर होऊ शकतात त्याचप्रमाणे भौतिक व भावनात्मक दृष्टीने जी वस्तू कुरूप अथवा लज्जास्पद वाटते तीच बुद्धी द्वारा तत्विक दृष्टीने पाहिल्यास आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व आपली दुःख दूर होऊ शकतात.
१ ६ )जीवनाकडे अध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्टिकोनातून उत्पन्न झालेल्या विषयास आनंद व प्रेरणादायी स्फूर्ती मध्ये परिवर्तित करता येते.
१ ७ )विषय ग्रहणाच्या वेदांत प्रक्रियेनुसार बाह्य वस्तूंचे ज्ञान इंद्रियांद्वारे होत असते इंद्रियांना होत नाही. इंद्रिय म्हणजे केवळ उपकरण आहे ज्यांच्याद्वारे जीव विषय ग्रहण करतो विषय जाणतो. विषयांना जाणणाऱ्या जीवाच्या अभावात केवळ इंद्रिय विषय ज्ञान करू शकत नाही. एकच वस्तू दोन भिन्न व्यक्तींना भिन्न प्रकारचे अनुभव देऊ शकते हे सगळ्यांनाच माहीत आहे एकाच वस्तूचे दोन भिन्नपणे अनुभव होण्याचे कारण दोन व्यक्तींच्या मानसिक रचनेतील अंतर आहे.
१ ८ )आपल्या असेही पाहण्यात येते की एका व्यक्तीला एकावेळी जी वस्तू अत्यंत प्रिय होती तीच दुसऱ्या अवस्थेत अप्रिय वाटू लागते याचे कारण कालांतराने त्याच्या मनात परिवर्तन येते. थोडक्यात जेव्हा आमचे मन इंद्रियांद्वारा बाह्य विषयांशी संपर्क साधते तेव्हाच कोणताही अनुभव होऊ शकतो हे स्पष्ट आहे.
१ ९ )जो मनुष्य जाणतो की जगातील वस्तू नित्य परिवर्तनशील असतात उत्पन्न व नष्ट होत असतात तो या वस्तूंमुळे स्वतःला कधीही विचलित होऊ देत नाही. काळाच्या प्रवाहात भविष्यातील घटना वर्तमानाचे रूप धारण करतात आणि आम्हाला विविध अनुभव प्रदान करून निरंतर भूतकाळात समाविष्ट होतात. जगातील एकही वस्तू एका क्षणासाठी सुद्धा विकृत झाल्याशिवाय राहू शकत नाही परिवर्तनाचा हाच एक अपरिवर्तनीय नियम आहे.
२ ० )आधी व अंत हे गुणधर्म असलेल्या वस्तूंच्या असण्या व नसल्याने बुद्धिमान पुरुषास शोक करण्याचे काही कारण ठरत नाही. शित-उष्ण यश-अपयश सुख-दुख यापैकी काहीच नित्य नाही हीच तर वस्तूस्थिती आहे तर प्रत्येक परिवर्तित परिस्थितीमुळे शुद्ध होणे किंवा चिंतित होणे हे अज्ञानाचे लक्षण नाही का? जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे चिंतीत न होता शांत राहून त्रास सहन केला पाहिजे सर्व प्रकारच्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत विवेकी पुरुष हेच एक तथ्य लक्षात ठेवतो की हाही प्रसंग तरेल.
२ १ ) सुखदुःखे शांतपणे सहन करणे ही आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या साधनेतील आवश्यक अट आहे. सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये जो विचलित होत नाही तोच अमृततत्त्वावर पोहोचण्यास योग्य असतो.
२ २ )शरीर मन बुद्धीने घेतलेला कोणताही अनुभव शाश्वत असत नाही.
२ ३ )सुख दुःखामध्ये ज्ञानी पुरुषाचा मानसिक समतोलच त्याला सर्वोच्च आत्मन्नतीची योग्यता प्रदान करते. जेव्हा व्यक्तीला वस्तू जगताचे अनित्य तत्व समजून येते तेव्हा त्या स्वानुभावाच्या ज्ञानातून त्याला पर्याप्त समतोल प्राप्त होतो. परिणामतः त्याला तितिक्षा प्राप्त होते व सुखाने तो उन्मानीत होत नाही व दुःखाने विषयदमय होत नाही.
२ ४ )जोपर्यंत आपण शरीरात आसक्त होऊन राहतो तोपर्यंत शारीरिक पिडांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आणि शांतपणे सहनी करू शकत नाही परंतु जेव्हा अत्यंतिक प्रेम किंवा द्वेषाच्या भावनेने उद्युक्त होतो तेव्हा शारीरिक सुखाचा सहजतेने स्वतःहून त्याग करतो.
२ ५ )जेव्हा एखाद्या विचाराने किंवा आदर्शाने व्यक्ती प्रोत्साहित होते तेव्हा त्याच्या पूर्तीसाठी तो शारीरिक व मानसिक सुख सोयींकडे सहजतेने दुर्लक्ष करतो.
२ ६ )जे भूतकाळात नव्हते आणि भविष्यकाळात राहणार नाही पण जे वर्तमान काळात असल्यासारखे वाटते त्याला सत असं म्हणतात.
२ ७ )वस्तू-भावना व विचार या तिन्ही स्तरावरील देहीत प्रत्यक्ष आणि परिवर्तन घडत असते, मन उत्क्रांत होते तर बुद्धी प्रगल्भ होते. उत्क्रांतीतील चढ-उतार आणि विकास या सर्व बदलांचे निर्देशन पूर्व अवस्थेचा मृत्यू असे आहे. याचे कारण संबंधित वस्तू बदलत असते शरीरमन बुद्धी नेहमीच परिवर्तन होत असते म्हणूनच आपल्या व्याख्येनुसार ते सर्व असत आहेत.
0 Comments