कळणे वासीयांचा दडपलेला संघर्ष ! ✍️ अर्चना परब

कळणे वासीयांचा दडपलेला संघर्ष ! ✍️ अर्चना परब

कळणे वासियांचा दडपलेला संघर्ष ! 

मूळ लेखक : अर्चना परब 



विनोद पाटील नावाच्या सैतानाचा डोळा निसर्गसंपन्न कळणे गावावर पडला आणि ईथेच सूरू झाला कळणे गावातील निसर्गाचा र्‍हास. बघता बघता ह्या माणसांने एक सामाईक डोंगर घश्यात घातला. ह्या गावातील काही लोक मुठभर पैश्यांसाठी विकले गेले. ते लोक  आज नक्कीच डोक्याला हात लाऊन बसले असतीलही पण त्यांच्या मुळे आज पुर्ण गाव परीणाम भोगत आहे. 

ह्याची सुरवात झाली 2009 साली. जनसुनावणी मध्ये ह्या मायनिंग प्रकल्पाला 100% विरोध होता. विरोध बघुन जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली. पण हा विरोध पुढेही कायमच होता. गावकऱ्यांच्या विरोधामुळे ह्या कंपनीने आपले डावपेच खेळायला सूरवात केली. मायनिंग परीसरा पासुन एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेली नदी आणि २०-२५घरांची वाडीच नकाशावरून गायब केली. आणि चार लोंकाना धाक दाखवून जमिन हस्तगत केली. ज्याची ईतर गाववाल्यांना काहीच कल्पना नव्हती. अर्थात हे सगळं करताना राजकीय नेत्यांचा पाठिंबा होताच. लाचखोर नेत्यांच्या देशात अश्या जमिनी हस्तगत करणे तितकं कठीण नाहीच. 

एक दिवस पहाटे मोठ्या मशीनीच्या आवाजानेच गावाला जाग आली. तेव्हा कुठे लोंकाच्या लक्षात आले की मायनिंग साठी रस्त्याचे काम चालू झालयं. गावात जेसिबी घुसले. आणि काहीच क्षणात सगळ गाव जमा झालं आणि बांदा-दोडामार्ग रस्त्यावर आंदोलन सूरू झालं. प्रंचड विरोध करत काम बंद पाडले. शेवटी संध्याकाळी गावात कंपनीची माणसे पोचली. आता मात्र गावकर्‍यांचा संयम तुटला आणि चेंगराचेंगरीत कंम्पनीच्या एका माणसाला दुखापत झाली. आणि ह्याच गोष्टीचे भांडवल करून ह्यांनी डाव साधला. काही लोंकाचे असेही म्हणणे आहे की त्या माणसाला त्याच्या गावी बिहारला पाठवले आणि गावकर्‍यांनी केलेल्या मारहाणी मुळे त्याचा मृत्यू झाला असे खोटे आरोप लावून  गावातील लोंकावर ३०२ कलम लावून त्यांना ह्यात अडकवले. ह्या प्रकरणात काही गावकरी भुमिगत झाले. पण आंदोलन चालुच होते लोक देवळात जमत होते. केस चालू होती पोलीस स्टेशन मध्ये फेर्‍या चालु होत्या. सहा महीने हेच चालू होते. 

मदत मागणार कोणाकडे कारण त्यावेळचे आमदार, खासदार, पालकमंत्रीही फिरकले नाहीत कारण सगळेच मायनिंगशी लागेबांधे असलेले. मायनिंग ह्यांच्याच कृपेने चालू झालं होतं. कंम्पनी आपले एक एक फासे टाकत होती. गावातील काही लोंकाना अटक झाल्याने लोक बिथरली होती. लहान थोर सगळे ह्या आदोंलनात होते. पण गावकऱ्यांचा निभाव लागलाच नाही. पोलीसांना हाताशी धरून दमदाटी करून एकदा मायनिंग चालू झालेच. मायनिंगला विरोध करणारे लोक अक्षरशः रडत होते. पण म्हणतात ना सत्ता आणि पैसा ह्या फुढे साधारण माणसांचा विरोध हा कधीच टिकत नाही. उघड्या डोळ्यांनी हा विनाश बघण्यापलिकडे काहीच राहीले नव्हते हातात. 

डंम्पर सुरू झाले, लाल मातीचे लोट हवेत दिसु लागले. अपघात, धुळ, प्रदुषणाचे दुष्टचक्र सुरू झाले. रस्त्याची वाट लागली ती वेगळीच आणि सुरू झाले ते कळण्या गावचे लचके तोडणे. २०२० पर्यंत हे असेच चालू होते. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात मात्र मायनिंगचे दुष्परिणाम दिसायला लागले. उत्खननात तयार झालेल्या विहीरीतून पाणी ओहोळात, ओहोळातून तळ्यात, विहीरीत, नदीत जायला लागले. पाणी दुषित झाल्याच्या तक्रारी पण केल्या पण लाचखोर प्रशासानाने मात्र डोळ्यावर कानावर नोटांची बंडल ठेऊन झोपलं होत. मग जेव्हा तिथलं  पाणी कमी आटत आले तेव्हा कुठे प्रदुषण नियंत्रण अधिकारी पोचले आणि आॅडीट करून केले. जे पाणी आठ दिवसात आटणारच होते ते प्रशासनाकडून बंद करण्यात आले असे भासवण्यात आले. 
कोरोनाकाळात सगळ बंद होत पण त्यात सुध्दा रोज तिनशे डंम्पर कळणे रेडी धावत होते ते सुध्दा आपल्या मायबाप नेत्यांच्या कृपेनेच.

आणि शेवटी २०२१ उजाडले, कंम्पनीचे संम्पलेलं लायसन्स ह्याच भिकार प्रशासनाने renew करून दिले आणि मायनिंग कुठलाही खंड न पडता चालुच राहीले. दुसर्‍या बाजूने वनविभागात सुध्दा ह्यांचे अतिक्रमण चालुच होते. आणि मग उजाडलीच ती सकाळ, ईतके दिवस ज्याची भीती वाटत होती ती सकाळ. २९ जुलै ईतके दिवस जो कसाबसा तग धरून उभा होता. ज्याचा कणाच ह्या लोंकानी तोडला होता. तो आडाळीचा डोंगर कोसळून खाली यायला लागला. मायनिंग मधल्या विहीरीत माती कोसळल्याने. विहीरीमधील मातीमिश्रीत पाणी कळणे गावच्या वस्तीच्या दिशेने बांधलेला बंधाऱ्यावरून पाणी गावात घुसले. रस्त्यावर असलेल्या पुलाचा पाईप मातीने बंद झाला. पाणी रस्त्यावरून वाहू लागलं. जस जसा डोंगर कोसळत गेला तसं तसं पाणी वाढू लागलं. लोक जमा झाले.जवळपास तीन तास माती चिकलाचा खेळ चालू होता. आणि अचानक परत एक मोठा आवाज झाला  स्फोट झाल्यासारखा आवाज मायनिंग च्या दिशेने आला. परत डोंगर कोसळला आणि बघता बघता पाण्याचा प्रचंड लोट खाली आला. काय झालं हे लक्षात येतय न येतय तो पर्यंत पाणी शेतात, घरात घुसलं. मिळेल तशी वाट काढत पाणी धावत होत. 

   भराव टाकून केलेला बंधारा किती काळ तग धरेल? बंधारा एवढा मोठ्या प्रमाणात फुटला की एका पुराच्या नदीचा प्रवाहा एवढा पाण्याचा लोट खाली येऊ लागला. काय करावं सुचेना. अजुही लोक घरातच होते. आरडा-ओरड, गोंधळ झाला. काही जण अजूनही झोपेत होते. त्याना ऊठवलं. सर्वांना बाहेर काढलं गेलं. रस्त्यावर शेतात घराबाहेर पाणी नव्हे तर चिखलच दिसत होता. आणि तोही तेलाचा तवंग असलेला चिखल. आत्ताच लावलेली शेती चिखलात गेली. ग्रामस्थ घाबरले, काय होईल याचा नेम लागेना. मोठी मोठी जीवंत झाडं प्रवाहातून वाहत आली. सगळीकडे चिखलच चिखल झाला. 

   यानंतर सुरू झाला तो जखमेवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम. प्रशासकीय अधिकारी हजर झाले. पोलिसांच्या ताफ्या सहीत. यानंतरच्या गोष्टी बोलणे म्हणजे निरर्थक. कदाचित ह्या मातीच्या खाली माणसं गाडली गेली असती तर आज ह्या घटनेची दखल सगळ्यांनी घेतली असती. 

पण एक गोष्ट खरी...
आपल्या भागात  मायनिंग किंवा तत्सम प्रदुषणकारी प्रकल्प होत असताना. आजुबाजूच्या  गावातील लोक मात्र बघ्याची भूमिका घेतात. आज जे बाजुच्या गावात होतय ते आपल्या गावातही  फुढे होऊ शकते. आजच्या घटनेनंतर लोक कळणे ग्रामस्थांना दोष देत आहेत. पण त्यांचा दडपून टाकलेला  संघर्ष मात्र ह्या कोणालाच नाही समजला. कळणे गावाने आपला गाव वाचवण्यासाठी जो संघर्ष केला त्यात आजुबाजुच्या ईतर गावांची साथ लाभली असती तर आज कदाचित कळणे गावावरील हे मायनिंग चे सकंट टळलं असते.

 संघर्ष कदाचित ईथे संपणार नाही कळणे गाव  मायनिंग मुळे डोळ्यासमोरून बघता बघता नाहीसा होईल आणि आजून एक नविन कळणे गाव मायनिंग च्या नकाशावर झळकेल...

माहीती साभार  - सिध्देश परब 

✍️ अर्चना परब.

Post a Comment

0 Comments