चहावाला “लेखक” लक्ष्मण राव !चहावाला “लेखक” लक्ष्मण राव !चहावाला “लेखक” वाचल-ऐकले की कपाळावर आठ्या येतातच ! कारण आपण आपल्याकडे लेखकाबद्दलच्या सर्वसाधारण समजूती अशा दृढ करून ठेवल्या आहेत की मनात प्रश्न उठल्याशिवाय राहत नाही की चहावाला लेखक कसा असू शकतो ? परंतु अशा समजुतीला खोट ठरवणारे एक ६६ वर्षीय लेखक आहेत ज्याचं नाव आहे लक्ष्मण राव ज्यांनी तब्बल २४ पुस्तकांचे लेखन-प्रकाशन केले असून त्यांना ३८ पेक्षा जास्त साहित्य पुरस्कार देखील भेटले आहेत !

दिल्लीच्या विष्णू-दिगंबर मार्गवर आपले चहाचे दुकान व बाजूला रस्त्यावर मांडलेला आपल्या लेखनाचा प्रपंच ! असे चित्र पाहिल्यावर माणूस तिथे न थांबला तर नवलच ! पुस्तके एकवेळ घेणार नाही परंतु चहा पिवून एक नजर मारल्याशिवाय जाणारच नाही. 


लक्ष्मण राव यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कुतुहलापोटी आमंत्रित करून सन्मानित देखील केले आहे. परंतु लक्ष्मण राव यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांचा दृढनिश्चय, साहित्याबद्दल असलेले प्रचंड प्रेम, ध्येयाबद्दलची चिकाटी आज आपल्यासारख्या सुख-चैनीमध्ये राहणाऱ्या परंतु थोडाशा अपयशाने खचून जाणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.


सोशल मिडीयावरील CTRL + V पंथातील लोकांनी तर नक्कीच प्रेरणा घ्यावी !

मुळचे मराठी असलेल्या लक्ष्मण राव यांचा जन्म २३ जुलै १९५२ रोजी अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात झाला. शाळेत असल्यापासूनच लेखक होण्याचे स्वप्न पाहणारे लक्ष्मण राव हलाखीच्या परिस्थितीमुळे मिळेल ते काम करून घरी हातभार लावत होते. ते काम करीत असलेली कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी वडिलांकडून अवघे ४० रु. घेवून वयाच्या २२ व्या वर्षी दिल्ली गाठली. दिल्ली म्हणजे हिंदी लेखकांचा दबदबा असलेले राज्य. आपल्या लेखनाचा प्रवास सुरु ठेवत त्यांनी दिल्ली मध्ये सुरवातीला बांधकाम मजुरापासून हॉटेल मध्ये भांडी धुण्याचे देखील काम केले. कालांतराने त्यांनी पानटपरीदेखील सुरु केली परंतु चहाविक्री मध्ये जास्त कमाई आहे हे पाहून त्यांनी आपले रस्त्यावरच चहाचे दुकान मांडले. १९७९ मध्ये त्यांनी आपली पहिली कादंबरी “नयी दुनिया की नयी कहानी” पूर्ण केली व तिच्या प्रकाशनासाठी प्राकाशकांकडे मोठ्या उत्साहाने गेले, परंतु एकाही प्रकाशकाने त्यांची कादंबरी प्रकाशित केली नाही ! लेखकाबद्दलच्या सर्वसाधारण दृढ समजूती ! रस्त्यावर उघड्याने चहा विकणारा लिहू कसा शकतो ? एवढ आपल्यासारख्या सोबत झाल असत तर आपण कधीच गाशा गुंडाळून माहेरी आलो असतो. परंतु लक्ष्मण राव खचले नाही, त्यांनी आपले चहाचे दुकान व लिखाण चालूच ठेवले व पैसे जमवून स्वतः आपली पहिली कादंबरी छापून प्रकाशित केली ! 
हळूहळू चर्चेचा विषय बनलेल्या लक्ष्मण राव यांची कीर्ती माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पर्यंत पोहोचली व त्यांनी चक्क लक्ष्मण राव यांना १९८४ साली आमंत्रित करून सन्मानित देखील केल. भेटीमध्ये राव यांनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहण्यासाठी परवानगी मागितली, परंतु इंदिरा गांधी यांनी आपल्या कामावर लिहा असे सुचवले. अत्यंत उत्साहाने लक्ष्मण राव यांनी लिखाण सुरु केले परंतु काही दिवसातच इंदिरा गांधी यांची हत्या झाली. पुढे लक्ष्मण राव यांनी “प्रधानमंत्री” कादंबरी लिहून प्रकाशित केली. 

लक्ष्मण राव यांची सर्वात जास्त लोकप्रिय व विक्री झालेली कादंबरी म्हणजे “रामदास” जी तांच्या गावातल्याच एका व्यक्तीरेखेवर आधारित होती. ह्या कादंबरीने त्यांना प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले व त्यांना २००३ मध्ये इंद्रप्रस्थ साहित्य भारती पुरस्कार देखील मिळवून दिला. 

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील लक्ष्मण राव यांना राष्ट्रपतीभवना मध्ये आमंत्रित करून गौरव केला आहे.


२ खोल्यांच्या घरात भाड्याने राहणारे लक्ष्मण राव आजदेखील आपले चहाचे दुकान त्याच पद्धतीने चालवतात  ज्या पद्धतीने आधी चालवत होते. आज त्यांचे पुस्तके आमेझोन व फ्लीपकार्ट देखिल उपलब्ध आहेत. आज जिथे पुस्तक-चित्रपट-नाटक यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी नको त्या पातळीवर जावून पब्लीसिटी स्टंट केले जातात तिथे आज लक्ष्मण राव आपल्या पुस्तक विक्रीसाठी सायकलवर निसंकोचपणे सहजभावाने फिरतांना दिसतात.


हिंदी विषयात बी.ए पदवीधर असलेल्या लक्ष्मण राव यांनी आता हिंदी साहित्य मध्ये एम.ए साठी प्रवेश घेतला आहे व त्यांना भविष्यात हिंदी साहित्य यात पी.एच.डी देखील करायची आहे.


 लक्ष्मण राव यांच्या संघर्षयुक्त लेखनाच्या प्रवासाकडे पाहतांना काही ओळी सहजच आठवतात !

ये गहराइया..ये लहरे ..ये तूफा..तुम्हे मुबारक !
मुझे क्या फिक्र, मे कश्तिया होसलो की बेमिसाल लिया बेठा हु !


Comments