काय आम्ही कुत्र्यापेक्षा वेगळे आहोत ?

काय आम्ही कुत्र्यापेक्षा वेगळे आहोत ?

 
Dev Avasthi

क़ाय आम्ही कुत्र्यापेक्षा वेगळे आहोत ??

प्रथमदर्शनी ही ओळ वाचल्यावर व्यक्तिवृत्तिनुसार एक झटका बसतो ! जशी वृत्ति तसा झटका ! झटका "मी" च्या खोलात उतरतो ! असो !

झाले ऐसे की पहाटे चक्करला गेल्यावर एक कुत्रा फारच आक्रमकपणे अंगावर आला ! मागे लागला ! साधारण १० - १२ कुत्र्याच्या घोळक्यामधे एक कुत्रा खूपच आक्रमक होता व येणाऱ्या प्रत्येक वाहनावर तो आपला राग व्यक्त करत होता व बाकीची कुत्री त्याला आपापल्या क्षमतेनुसार साथ देत होती ! त्यामुळे त्याचा व त्याच्या सोबत्यांचा आविर्भाव दुरुन पाहता हेदेखील लक्षात आले होते की हा आपल्यादेखिल अंगावर येणार ! व त्याप्रमाणे तो आलादेखील ! परंतु अशा अनेक घटनांचा अनुभव पाठीशी असल्यामुळे ह्यातून शांतपणे सामोरे जावून पुढे गेलो !

आता महत्वाचा मुद्दा !

कुत्री अस का करतात ? कारण येणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी त्यांची धारणा त्यांच्या पूर्वाअनुभवानुसार काही काळासाठी का होईना दृढ़ झालेली असते ! कोणत्या एका वाहनाने ह्या कुत्र्याच्या सोबत्याला म्हणा अथवा पिलांना म्हणा चिरडलेले असते व त्या घटनेचा एक राग-क्षोभ त्यांच्या बुद्धिवर काही काळासाठी कोरला जातो व त्याचीच प्रतिक्रिया म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर ते आक्रमण करत असतात !

ही घटना घड़ताक्षणीच डोक्यात एक विचार आला !

क़ाय आम्ही कुत्र्यापेक्षा वेगळे आहोत ??

आमच्या पण अशाच धारणा नाहीत क़ाय ?

आम्हीदेखील स्वानुभव म्हणा अथवा इतरांनी आम्हास सांगितलेल्या त्यांच्या अनुभवावरुन धारणा तयार केल्या नाहीत का ? मग ह्या धारणा जात - धर्म – आस्तिकता – नास्तिकता – समाज – संत – महापुरुषे ई. अशा एक न अनेक वेगवेगळ्या घटकांशी संबधित आहेत ज्या संपूर्ण मानवसमाजा मधे अशांती व अस्थिरता निर्माण करण्यासाठी एकाप्रकारे इंधनाचच काम करीत आहेत ! ह्या धारणा सर्वच तथाकथित “मानव” समाजात अस्तित्वात आहेत ज्याचा उपयोग ह्याच समाजातील प्रत्येक घटक आपल्या वेगवेगळ्या स्वार्थाला साध्य करतांना दिसून येतो ! आजवर ह्या धारणांनी मानवसमाजाचे जितके नुकसान केले आहे तितके कशाही इतर कोणत्या गोष्टीमुळे झाले असण्याची शक्यता कमीच आहे ! ह्यातही जाती - धर्माच्या धारणांना सगळ्यात वरचे स्थान प्राप्त आहे !

आपल्यासोबत असे अनेक वेळेस झाले असण्याची शक्यता आहे की अशी काहीतरी घटना घडते की आपल्या अनेक काळा पासून मनात - मेंदूवर कोरल्या गेलेल्या धारणांना एक झटका बसतो व सत्य एका प्रकाशाप्रमाणे धारणारुपी अंधःकाराला दूर सारण्यासाठी आपल्यासमोर येऊन ठाकते ! आता ह्या क्षणी जर आपण आपल्या अहंकाराला सत्यापेक्षा जास्त महत्व दिले तर सत्य पुन्हा अज्ञानाच्या अंधकारात गुडूप होऊन जात व आपल्या धारणा अधिक तीव्र रूपाने आपल्या सोबत पुढील अंधकाराने भरलेल्या प्रवासात आनंदाने सहभागी होतात ! ह्या क्षणी आपण आपल्या अहंकाराला सत्यापेक्षा जास्त महत्व दिल्याने आपल्या व कुत्र्यातला भेद संपवून टाकतो ! कारण प्रकृतीने जरी सगळ्यांना एक जीव म्हणून जन्माला घातले असले तरी मानवाला एक सद्विवेकबुद्धीचे वरदान प्राप्त आहे जे इतर कुणाही जीवाच्या वाट्याला आलेले नाही ! जर प्रकृतीने दिलेल्या ह्या वरदानाचा आम्ही योग्य वापर करणार नसू तर मला नाही वाटत की आपल्यामध्ये व कुत्र्यामध्ये फार काही फरक आहे ! उलटपक्षी आपण कुत्र्यापेक्षाही हिन आहोत कारण आपण आपलयाकडे असलेल्या सद्विवेकबुद्धी रुपी वरदानाची एकप्रकारे अवेहेलनाच करत आहोत !

मी - माझ - माझ्या चे आपण - आपलं - आपल्या मध्ये रूपांतरण होण्यामध्ये ह्या धारणा फार मोठा अडसर आहे ! सध्यातरी ह्या धारणांना समाजातून संपूर्णपणे  हद्दपार करण्याचा मार्ग "माझ्यासमोर" नाही ! 

त्या हद्दपार होऊ शकतात कि नाही याबद्दल देखील शंकाच आहे कारण समाजात अशा धारणा रुजविणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे व ह्या धारणा त्यांना त्यांच्या विशेष उद्दिष्टपूर्तीसाठी समाजात मोठ्या प्रमाणात रुजवून ठेवणे अनिवार्य आहे ! परंतु शोध सुरु ठेवला पाहिजे !


Post a Comment

8 Comments